Thursday, March 27, 2014

व्यर्थ खटाटोप


तारुण्य जपण्याचा व्यर्थ खटाटोप.....

     आजच्या लेखाला असं शीर्षक का बरं सुचलं असेल मला....ते पण वयाच्या 20 व्या म्हणजे ऐन उमेदीच्या काळात....आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग नकळत घडतात की ते आपल्याला भविष्याचा विचार करायला लावतात...अन भविष्याचा विचार करायला लावनार्‍या अशा एका प्रसंगाला मी नकळत सामोरं गेलोय....

     प्रसंग असा की ,नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यानंतर घरी (रूमवर )जाण्यासाठी मी बस स्टॉप वर बस ची वाट बघत थांबलो होतो. प्रचंड वैतागल्यानंतर तासाभराणे का असेना मला हव्या असलेल्या बस चं बस स्टॉप वर आगमन झालं. स्टॉप वर गर्दी कमी असल्यामुळे बस मध्ये चढल्यानंतर पहिल्यांदाच मला बस मध्ये एक रिकामी खुर्ची दिसली अन पटकन मी तिच्यावर जाऊन बसलो.मनोमन देवाचे लाख लाख आभार मानले,कारण इतक्या दिवसाच्या प्रवासात मला कधीही बस मध्ये बसायला जागा मिळायला न्हवती..असो..

     एक स्टॉप पुढे गेल्यानंतर बस मध्ये गर्दी झाली.मी मात्र निवांत माझ्या खुर्चीवर बसलो होतो..बरेच लोक कशाचा तरी आधार घेऊन स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होती. bus थोडी हेलकावे खात होती.माझ्या समोरच एक सद्गृहस्थ कसरत करत नीट उभं राहण्याचा प्रयत्न करत होते...फॉर्मल जीन्स पॅंट अन रेघारेघांचा सदरा असा काय तो त्यांचा पोशाख ..बर्‍यापैकी तरुण दिसण्यासाठी बर्‍यापैकी खटाटोप केला गेला होता ..कपाळावर कायमस्वरूपाच्या आट्यांच अस्तित्व होतं...मी मात्र गर्दीत उभे राहिलेल्या लोकांकडे बघून मनोमन सुखावत होतो कारण मला कधीच्या काळाने बसायला मिळाले होते ...रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दी मुळे बस ला सारखा ब्रेक लागत होता. या मुळे माझ्या समोरच्या सद्गृहस्थांना उभं राहणं थोडं कठीण जात होतं ...

    आतामात्र मी माझा विकृत आनंद बाजूला ठेऊन त्या सद्गृहस्थांना म्हणालो, काका तुम्ही बसताय का इथे मी उभा राहीन...!!क्षणभर ते सद्गृहस्थ गप्प झालेत अन आपल्या शरीराचं निरीक्षण करू लागले ,,,मी थोड्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होतो.एरवी बस मध्ये एखादी खुर्ची रिकामी झाल्यावर तिच्यावर बसण्यासाठी झुंबड उडते अन हा काय एवडा विचार करतोय कळत न्हवतं.कालांतराणे भानावर येवून तो मला म्हणाला “नको रे बस तू तिथेच ....मला काय बोलायचं कळेंना....कारण त्याचा चेहरा खरकण उतरला होता..अन आता तो पूर्वी पेक्षा नीट उभं राहण्यासाठी अक्षरश: काबाड कष्ट करत होता,माझ्या शेजारील खुर्ची रिकामी झाली तरी त्यावर तो बसला नाही..जणू काही त्याला मला सांगायच होतं की मी चांगला धडधाकट आणि तरुण आहे.  

    माझा स्टॉप आला मी त्या सद्गृहस्थाच्या विचारातच खाली उतरलो, तो नाही उतरला !!बहुतेक त्याला अजून पुढे जायचं होतं.आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला..नकळत का असेना मी त्या सद्गृहस्थाच्या भावना दुखवल्या होत्या...मी माझा चांगुलपणा दाखवण्याच्या नादात त्याला त्याच्या संपत आलेल्या आयुष्याची जाणीव करून दिली होती.

      मित्रांनो तरुंणपणातल्या बेपर्वा,काहीही करण्याची तूफान ईच्छा असणार्‍या या वयात भविष्याचा विचारपण मनाला शिवत नाही ....दुनिया गई भाड मै ! या विचारांचं हे वय असते....पण माझ्या मित्रांनो थांबा, देवाने आपल्याला संपूर्ण आयुष्य तारुण्यावस्था  बहाल नाही केलीय....आयुष्यात अनेक अवस्था आपल्या नावावर आधीच नोंद करून ठेवल्या आहेत त्याची जाणीव स्वत:चं ठेवली पाहिजे,जेणेकरून कुणाकरवी त्याची जाणीव झाल्यास दु:खाच्या गर्तेत न जाता ती स्वीकारण्याची हिम्मत आपल्यात यावी...
                                                                                                        
झेंब्या तावडे

Labels: